बंद

    परिचय

    प्रकाशित तारीख : November 14, 2019

    सन 1960 पासून चंद्रपूर जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा म्हणून गणला जाऊ लागला. सन 1874 पर्यंत जिल्ह्यात मुल, वरोरा व ब्रम्हपूरी या तीन तहसिल होते. त्यानंतर सन 1874 मध्ये मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपुष्टात येवून त्यातून चार तहसिल चंद्रपूर, जिल्ह्याला जोडण्यात आले. व तहसिलचे मुख्यालय सिरोंचा येथे ठेवण्यात आले. सन 1905 मध्ये गडचिरोली मुख्यालय असलेली नविन तहसिल निर्माण करण्यात आली. सन 1907 मध्ये नव्यानेच निर्माण झालेल्या दुर्ग जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारीचा काही भाग स्थानांतरीत करण्यात आला. याच वर्षी लोअर सिरोंचा तहसिलातील केरला, अवलक आणि पुगूर या तीन विभागांचा जवळजवळ 1560 चौ.कि.मी. हिस्सा संलग्न मद्रास राज्यात स्थानांतरीत करण्यात आला. सन 1956 मधील राज्य पुनर्रचनेचा परिणाम म्हणून पुर्वी मध्यप्रदेशात असलेला हा जिल्हा मुंबई राज्यात विलीन करण्यात आला.

    याच वर्षी हैद्राबाद राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तहसिल हा नांदेड जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर तो नांदेड जिल्ह्यातून वगळून सन 1959 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यास जोडला गेला. सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा म्हणून गणला जाऊ लागला. यावेळी जिल्ह्यात एकुण सहा तालुके होते हा जिल्हा आकारमानाने भारतात दुसर्‍या व महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा होता. दिनांक 1 मे 1981 पासून जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना तहसिलचा दर्जा देण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात सहा ऐवजी एकुण आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. नंतर प्रशासकिय सोयीसाठी जिल्ह्याचे दिनांक 16 ऑगष्ट 1982 रोजी विभाजन करुन गडचिरोली, धानोरा , आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा , अहेरी आणि एटापल्ली असे आठ नविन तालुके नवनिर्मीत गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट केले. परिणामी चंद्रपूर, भद्रावती, वरोरा , चिमूर, नागभिड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी व राजूय या दहा तालुक्यांचा चंद्रपूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. 15 ऑगष्ट, 1993 पासुन मुल आणि राजुरा या दोन तालुक्यांचे परत विभाजन होऊन अनुक्रमे बल्लारपूर व पोंभूर्णा या दोन तालुक्यांची निर्मीती झाली. तसेच 02 जुलै, 2002 पासून राजुरा आणि आणि कोरपना तालुक्यांचे विभाजन होऊन जिवती तालुक्याची निर्मीती झाली अशाप्रकारे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकून पंधरा तालुके कार्यरत आहेत. महसूली कार्यप्रणाली सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दिनांक 26 जुलै, 2013 असाधारण क्र. 3 च्या राजपत्रान्वये 15 ऑगष्ट 2013 पासून नव्याने गोंडपिपरी, मुल, व चिमूर येथे नव्याने महसूल उपविभागीय कार्यालयांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 7 महसूल उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत. जिल्ह्यात 17.7 टक्‍के लोक आदिवासी आहेत. महाराष्ट्रातील आदिवासीचे प्रमाण एकुण लोकसंख्या 9 टक्के आहे. जिल्ह्यातील आदिवासीमध्ये गोंड, कोलाम आणि प्रधान या प्रमुख जमाती आहेत. जिल्ह्यातील 79 टक्‍के लोक शेतीवरच आपली उपजिविका करतात. जिल्ह्यातील नागभि, ब्रम्हपूरी, सिंदेवाही व मुल या पुर्वेकडील भ्रागात भात हे प्रमुख पिक असून उर्वरित तालुक्‍यात ज्वारी, सोयाबिन, तुर व कापूस ही प्रमुख पिके होतात.